ब्रह्मगिरी वाचविण्यासाठी सहा राज्यांच्या वतीने एकत्रित पद्धतीने लढा देण्याचा निर्णय : राष्ट्रीय जलतज्ञ राजेंद्र सिंह

0
slider_4552

तीर्थक्षेत्राचा कायापालट करतांना पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरणीयदृष्ट्या तसेच धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या सह्याद्री डोंगररांगेतील ब्रह्मगिरी पर्वताचे लचके तोडण्याचे काम रिअल इस्टेटमधील भूमाफियांकडून होत आहे. मात्र, ब्रह्मगिरीची हानी हा केवळ नाशिक किंवा महाराष्ट्रापुरता विषय नसून सहा राज्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे ब्रह्मगिरी वाचविण्यासाठी सहा राज्यांच्या वतीने एकत्रित पद्धतीने लढा देण्याचा निर्णय तरुण भारत संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केला. राज्यांमधील निर्बंध शिथिल होताच ब्रह्मगिरीला भेट देणार असून याविरोधात तातडीने जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

विकासाच्या नावाखाली खासगी विकासकाकडून ब्रह्मगिरी डोंगर पोखरण्याचे प्रकार सुरू आहेत. खडी, मुरूम, दगड काढत शेतघर, डोंगरी रिसोर्टच्या नावाखाली नैसर्गिक टेकड्या, डोंगरांना उद्ध्वस्त केले जात आहे. त्यामुळे ब्रम्हगिरी वाचविण्यासाठी पर्यावरणीय संघटनांनी एकत्रित येत मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेत आपली भूमिका विषद केली. ते म्हणाले, सह्याद्रीच्या रांगेतील सर्वात मोठा डोंगर असलेल्या ब्रह्मगिरी डोंगरामधून वैतरणा, अहिल्या नदी आणि गोदावरी नदी या नद्यांचा उगम होतो. गोदावरी पूर्वेच्या दिशेने आंध्रप्रदेशात राजमहेन्द्री इथे बंगालच्या उपसागराला मिळते. त्यामुळे ब्रह्मगिरी सुरक्षित तर गोदावरी सुरक्षित अशी भावना सिंह यांनी व्यक्त केली. त्र्यंबकेश्वर येथील ऐतिहासिक दुर्ग भांडार किल्ल्याची भूमी, तसेच गंगा गोदेचे उगमस्थान आणि साधू-संतांची भूमी असलेल्या या डोंगराला खोदून उत्खनन करण्याने येथील जैवविविधता, पर्यावरण धोक्यात आले आहे. मात्र, प्रशासन कारवाई करण्यापलिकडे काहीच करत नाही, ही शोकांतिका आहे.

पौराणिक, आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या आणि पर्यावरण संवेदनशील असलेल्या ब्रह्मगिरी वाचविण्यासाठी येथील आखाड्यांचे साधू-संत, त्र्यंबकेश्वरमधील पुजारी, नागरिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ब्रम्ह्मगिरी गोदावरी ही कोणा एका मालकीची नाही, तर ही राष्ट्रीय संपत्ती आहे. ब्रह्मगिरीवर उगम पावणारी गोदावरी नदी सहा राज्यांतून जाते, त्यामुळे ब्रह्मगिरी वाचवण्यासाठी सहा राज्यांनीही पुढाकार घेतला आहे. त्यामुळे सध्या तरी प्रशासनाने संबंधित विकासकाचे कामकाज थांबवले असले, तरी नैसर्गिक संपदा वाचविण्यासाठी निर्बंध शिथिल होताच ब्रह्मगिरीला भेट देऊन पुढील भूमिका ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

See also  तुमच्या कष्टाचा ठेवा विकू नका, तसेच मराठी टक्का कमी करू नका : शरद पवार

आपले आंदोलन हे शांततापूर्ण आणि अहिंसात्मक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ऑनलाईन पत्रकार परिषदेत तेलंगणाचे जलंसधारण राज्यमंत्री प्रकाश राव, आंध्र प्रदेशचे जनसेना पार्टीचे प्रवक्ता सत्यनारायण बोलीशेट्टी, प्रा. पोददार, ओरिसाहून सुदर्शनदास, नरेंद्र चूग, नाशिकहून राजेश पंडीत, छत्तीसगडहून गौतम बंडोपाध्याय सहभागी झाले होते.