मुंबईः
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे आणि ही लाट आल्यावर सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. यामुळे महाराष्ट्रात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कोरोनाची तिसरी लाट येऊच नये यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी राज्यातील नागरिकांना केले.
लसीकरणातून तिसऱ्या लाटेचा धोका कमी करता येईल. ही बाब विचारात घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी; असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. केंद्र सरकारकडून लस मिळत आहे. पण अतिरिक्त साठा हवा असल्यास राज्यांना थेट उत्पादकांशी चर्चा करुन लस खरेदीची मुभा आहे. या नियमाआधारे महाराष्ट्र शासन लस उत्पादकांच्या संपर्कात आहे. महाराष्ट्राचा प्रयत्न एकरकमी व्यवहार करुन किमान १२ कोटी डोसची खरेदी करण्याचा आहे. यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रातील वैद्यकीय सोयीसुविधांचे प्रमाण वाढवणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
याआधी राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेश टोपे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका विचारात घेऊन महाराष्ट्रात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. महाराष्ट्रात १८ पेक्षा जास्त वयाच्या तसेच लहान मुलांवरील उपचारांसाठीच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय क्षमता वाढवणे आवश्यक आहे; असेही टोपे म्हणाले होते.