पाषाण :
सरकारने लागू केलेल्या दोन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊनला आज पाषाण, औंध बाणेर, बालेवाडी, परीसरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद राहिली. सकाळच्या सत्रात तुरळक गर्दी दिसून आली. मात्र दुपारनंतर शुकशुकाट होता. औंध मध्ये मेन रोड ला पोलिस चेक नाका सुरू होता. येणाऱ्या जाणार्यांची तपासणी सुरू होती.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. महापालिका क्षेत्रातही रुग्णसंख्या वाढती आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी सरकारने लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे.
मेडिकल, दुध, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. नागरिकांनीही स्वतःहुन घराबाहेर जाणे टाळले. अत्यावश्यक सेवा वगळता विकेंड लॉकडाउनला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचे चित्र आज दिवसभर दिसून आले.