पाषाण :
पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुसरोड, पंचवटी भागात सुरू असलेल्या कोरोनाचा प्रसार लक्षात घेता पाषाण गावामध्ये कै.सहदेव निम्हण कुटी रुग्णालय येथे सुरु असलेले लसीकरण केंद्र अपुरे पडत आहे. म्हणून स्वीकृत सदस्य सचिन पाषाणकर यांनी त्या अनुषंगाने आणखी किमान ५ ठिकाणी या परिसरात लसीकरण केंद्रे चालू करावीत अशी मागणी आज औंध प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त जयदीप पवार यांच्या माध्यमातून, पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी वैशाली जाधव यांच्याकडे केली. त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योगभवन, सुसरोड या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्याचे जाहीर केले. तसेच सुचवण्यात आलेल्या अन्य ४ ठिकाणी पाहणी करण्याचे मान्य केले.
तसेच पाषाण परिसरातील नागरिकांना कोरोना चाचणी (RT-PCR ) टेस्ट करण्यासाठी बोपोडी येथील खेडेकर हाॅस्पिटल लांब पडत असल्याने पाषाण परिसरात कोरोना चाचणी (RT-PCR) टेस्ट तपासणी केंद्र चालू करावीत, अशी मागणी सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांच्याकडे केली. त्यांनी या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन दिले.
त्यामुळे लवकरच सुस रोड पाषाण भागांमध्ये लसीकरण केंद्र सुरू होईल अशी माहिती सचिन पाषाणकर यांनी मॅक न्यूज शी बोलताना दिली. नागरिकांनी या सुविधेचा फायदा घेवून स्वतःच्या सुरक्षितेसाठी लसीकरण करून घ्यावे, असे आव्हान त्यांनी यावेळी केले.