गर्दी टाळण्यासाठी दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी लागू करण्याचा राज्यसरकार चा निर्णय.

0

मुंबई :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर नियमावली जारी करण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उद्या सरकारकडून यासंदर्भातील आदेश आणि नियमावली काढण्यात येणार आहे. नवी नियमावली मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आली आहे. आज काही कडक निर्बंध लावण्यावर राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. मिशन बिगीन अगेन ऐवजी ‘ब्रेक दि चेन’ असे या आदेशांना संबोधण्यात येणार.

हे निर्बंध लावतांना राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून, लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील.

आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयानंतर या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करताना आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले.

See also  ५ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होणार : राज्य निवडणुक आयोगाची घोषणा