सोसायट्यामध्येच वाढले करोनाचे सर्वाधिक प्रमाण.

0
slider_4552

पुणे :

शहरात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून करोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. शहरातील गृहनिर्माण सोसायटय़ांमध्येच करोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या गुरुवापर्यंत २५ मार्च शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या २०६ एवढी झाली आहे. त्यामध्ये ७८ इमारती आणि ९५ गृहनिर्माण संस्था, तर ३३ छोटे परिसर यांचा समावेश आहे.

शहरात करोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, अनेक रुग्णांमध्ये लक्षणे आढळून येत नसल्याने संबंधितांचे गृह विलगीकरण करण्यावर भर दिला जात आहे. महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयांतर्गत इमारत, सोसायटी आणि छोटा परिसर असे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत. चार किंवा पाच इमारती असणाऱ्या एखाद्या गृहनिर्माण संस्था आणि छोटय़ा परिसरात २० पेक्षा जास्त रुग्ण निदर्शनास आल्यास संबंधित सोसायटी किंवा छोटा परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे.

एखाद्या इमारतीमध्ये पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास ती इमारत सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येत आहे. इमारती किंवा सोसायटीमध्ये विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्का मारण्यात येत असून प्रवेशद्वारावर प्रतिबंधित क्षेत्राबाबत माहिती लिहिली जात आहे. रुग्णांना या सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातून आत-बाहेर करण्यास मनाई करण्यात आली असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत असल्याने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांच्या संख्येतही बदल होत आहेत, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

See also  पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांसाठी मुळशी धरणातून 5 टीएमसी पाणी घेण्यात येणार