पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह ५० जणांवर गुन्हे दाखल

0
slider_4552

पुणे :

राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्णवाढ मोठी असून त्यासाठी प्रशासन आवश्यक ते प्रयत्न करत आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये करोना रुग्ण वाढत आहेत, तिथे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र राजकीय पक्षांकडून या निर्बंधांना हरताळ फासण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह ५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चंद्रकांत पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी रविवारी टिळक चौकात निदर्शने केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात गर्दी जमविण्यास प्रतिबंधात्मक आदेश असतानाही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाटील यांच्यासह ५० जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांना देखील करोना नियम मोडल्याचा दणका बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी भाजपकडून पुण्यात आंदोलन करण्यात आले. शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहरासह संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तरी करोनाचे नियम मोडून भाजपकडून आंदोलन करण्यात आले. त्यामुळे चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुन्हे नोंदविण्यात आले.

जमाव करणे, आपत्ती व्यवस्थापन कायदा, महाराष्ट्र पोलिस अधिनियम, कलम १८८ नुसार पोलिसांच्या सुचना तसेच कलम २६९/७० नुसार साथरोगासंबंधीच्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सध्या मिळत आहे.

See also  कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटूंबियांना महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने फराळ