मुंबई : प्रतिनिधी:-
मुंबई शहर आणि उपनगरात आता कोरोना परिस्थितीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. मात्र सुरक्षेच्या कारणात्सव मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी नव्या वर्षातच सुरु होणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. त्यामुळे लोकल सुरक्षेच्या कारणात्सव आता सुरु करणे योग्य नसल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितल्याने चाकरमान्यांना आणखी पुढील काही दिवस पर्यायी वाहतूकीने प्रवास करावा लागणार आहे.
कोरोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून चाचण्यांची संख्या वाढवण्यासोबतच रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तिंची चाचणी व पडताळणी सातत्याने करण्यात येत आहे. महापालिकेने केलेल्या उपाय योजनांमुळे दिल्लीच्या तुलनेत मुंबईने कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले आहे. मात्र नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. याचपार्श्वभूमीवर इकबाल चहल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली आहे.