पुणे :
पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये पीएमपीएलने 10 रुपयांमध्ये दिवसभर वातानुकूलित प्रवास करता येणार आहे. त्यासाठी महापालिका मध्यम (मिडी) आकाराच्या 50 वातानुकूलित बस खरेदी करणार आहेत. त्यासाठी 13 कोटी 47 लाख रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
या संदर्भात स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, शहरातील खासगी वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता.पेठांमध्ये कमी रुंदीचे रस्ते आहेत. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा. त्याचबरोबर नागरिकांना स्वस्तामध्ये पीएमपीएलने प्रवास करण्यात यावा यासाठी 10 रुपयांमध्ये दिवसभर प्रवास करता येणार आहे.शहरातील पुणे स्टेशन, स्वारगेट, त्याचबरोबर सर्व पेठांचा भागामध्ये नागरिकांसाठी ही सेवा उपलब्ध होणार आहे.
महापालिका 26 लाख 95 हजार रुपयांना एक बस खरेदी करणार असून 50 बससाठी 13 कोटी 47 लाख रुपये इतका खर्च होणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष रासने यांनी 2019-20 या वर्षांच्या अंदाजपत्रकामध्ये ही योजना मांडली होती. या योजनेची आता प्रत्यक्ष अमंलबजावणी होणार आहे.