दहशतवादाला भीक न घालता सहल पूर्ण करण्याचा पुण्यातील माजी शिक्षकांचा निर्धार…!

0
slider_4552

पुणे :

नुकत्याच झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्व भूमीवर या दहशतवादाला व त्यांच्या भितीला भीक न घालता पुणे शहरातील मनपा शिक्षण मंडळातील माजी शिक्षकांच्या ग्रुपने जम्मू कश्मीर मध्ये आपली पर्यटन यात्रा चालूच ठेवत आर्मी वरती विश्वास व्यक्त केला. या पर्यटन यात्रेमध्ये पुणे औंध, पाषाण मधील ६७ ते ७५ वयो गटातील ज्येष्ठ नागरीक शिक्षक सहभागी आहेत.

पुण्यामधील माजी शिक्षक 18 एप्रिल पासून ते 25 एप्रिल पर्यंत जम्मू कश्मीरच्या पर्यटन यात्रेसाठी गेले आहेत. हल्ल्याच्या एक दिवसानंतर त्यांचा पहलगामचा दौरा होता. पहलगाम मधील हल्ल्याच्या घटनेनंतर काश्मीरमधील अनेक नागरिकांनी आपल्या राज्यामध्ये सुरक्षित जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. अशा वेळी या माजी शिक्षकांच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक केले जात आहे.

सहलीत सहभागी पुणे महानगरपालिकेचे माजी पर्यवेक्षक उत्तम कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले, आम्हाला या कठीण प्रसंगी काश्मीर मधील मधील नागरिकांच्या वर पुर्ण विश्वास आहे. आपल्या भारतीय आर्मी व इतर सुरक्षा यंत्रणांवर पुर्ण विश्वास ठेऊन आम्ही संपूर्ण यात्रा पुर्ण करणार असल्याचे सांगीतले.

माजी मुख्याध्यापक आत्माराम जाधव म्हणाले, आम्ही या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. हा देश आमचा आहे व या देशातील प्रत्येक भूभाग हा आमचा आहे ही भावना यानिमित्ताने मला अधिक प्रबळ करायची आहे. आम्ही आज शंकराचार्य मठात गेलो होतो. रस्त्यामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे जागोजागी सुरक्षा जवान आहेत.

गुलबर्ग, सोमवार, दललेक, लाल चौक आदी परिसरामध्ये ही सर्व मंडळी जाणार असून शासनाने दिलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन करत आम्ही पर्यटन यात्रा निर्भीडपणे पार पाडणार असून आम्ही दहशतवादाला भीक घालत नाही हा संदेश देणार असल्याचे यावेळी सांगितले. तसेच हल्ल्यानंतर काश्मीर परिसरातील नागरिकांनी पर्यटकांना अपेक्षित सहकार्य सातत्याने केले आहे. काश्मीरमधील बंधुत्वाची भावना असलेल्या नागरिकांमध्ये देखील आमच्या या निर्णयामुळे देशाच्या एकात्मतेची भावना सातत्याने राहील अशी आमचे अपेक्षा आहे.

See also  भारतीय औषध नियंत्रक जनरलने जायडस कॅडिला लसीच्या आपत्कालीन वापरासाठी दिली परवानगी