केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते साहित्य वाटप…
बालेवाडी :
भव्य दिव्य‘अटल सेवा महाआरोग्य शिबिरा’ मध्ये 35 ते 40 प्रकारच्या विविध तपासण्या आणि शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असून, त्यांना अधिक चांगल्या सेवा व सुविधा मिळत आहेत. शिबिरात गर्दी पाहता, या दोन दिवसांत सुमारे 40,000 ते 50,000 नागरिक शिबिराचा लाभ घेतील, असा अंदाज आहे. आरोग्याच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी एकत्रितपणे उपलब्ध करून देणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
भाजपचे शहर चिटणीस लहु बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली ‘लहु बालवडकर सोशल वेलफेअर’ व ‘सनराईज मेडिकल फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अटल सेवा महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 24 व 25 जानेवारी 2025 रोजी बालेवाडी, हायस्ट्रीट ग्राऊंड, पुणे येथे सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:00 या वेळेत आयोजित करण्यात आले. आज शिबिराचा दुसरा व शेवटचा दिवस आहे.
शिबिराच्या पहिल्या दिवशीही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोफत चाचण्या व तपासण्या करून घेतल्या. या शिबिरामध्ये व्हीलचेअर, इलेक्ट्रिकल बायसिकल, श्रवणयंत्र अशा विविध प्रकारचे साहित्य मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते रुग्णांना वितरित करण्यात आले.
यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, की “सामाजिक बांधिलकीची भावना जोपासत समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा आम्हाला पक्षाच्या संस्कारांतून मिळाली आहे. हाच विचार मनात ठेवून आमचे सहकारी लहु बालवडकर यांनी भव्य दिव्य ‘अटल सेवा महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन केले आहे. शिबिरात पुण्यातील जवळपास 60 नामांकित हॉस्पिटल्सची साथ मिळाली आहे, ज्यांनी उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरवली आहे. तसेच, राज्य शासन, महानगरपालिका आणि केंद्र सरकारच्या आरोग्याशी संबंधित जवळपास 50 योजना या ठिकाणी थेट नागरिकांना मिळत आहेत. शिबिरामध्ये विविध आरोग्यसेवा आणि तपासण्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून, लहु अण्णा बालवडकर यांनी उचललेले हे आरोग्य सेवेसाठीचे पाऊल समाजाला नवी दिशा देणारे ठरेल, यात शंका नाही.”