पुणे :
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिट अँड रनच्या घटना वाढताना दिसून येत आहेत. पुण्यात काही महिन्यांपूर्वी घडलेल्या अपघाताने देशभर खळबळ उडाली होती. अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत कारने दोघांना चिरडले होते. त्यानंतर या घटना लगातार होताना दिसून आल्या. अशात पुण्यात आणखी एक भीषण अपघात घडला आहे. पुण्यातील वाघोली परिसरात पुन्हा एक हिट अँड रनचा प्रकार घडलाय. यामुळे एकच खळबळ उडालीये.
वाघोली परिसरात फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना डंपरने चिरडल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. यात 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. या दुर्घटनेतील मृतांमध्ये दोन बालकांसह त्यांच्या काकाचा समावेश आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
नेमकं काय घडलं?
वाघोली येथील केसनंद फाट्यावरुन पुण्याच्या दिशेने येताना हा अपघात घडला. रात्री 12 ते 1 च्या सुमारास वाघोली चौकातील वाघोली पोलीस ठाण्यासमोरच ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बिल्टवेल इंटरप्राईजेस कंपनीचा हा डंपर असून डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आहे.
फुटपाथवर झोपलेले कामगार हे अमरावतीहून पुण्यात कामासाठी आले होते. अपघात घडला त्यावेळी फुटपाथवर 12 जण झोपले होते. तर काहीजण फूटपाथच्या बाजूला असलेल्या झोपडीत झोपले होते. गाढ झोपेत असतानाच काळाने त्यांचा घात केला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय.
तर, जखमींना तातडीनं ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघातात जखमी झालेले सर्व कामगार रविवारी रात्रीच अमरावती येथून कामासाठी आले होते.अशी माहिती समोर येत आहे.