मॅकन्यूज :
आपल्या जादुई तबला वादनाने जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं आज अल्पशा आजाराने निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते.
मागच्या काही वर्षांपासून हृदयविकाराशी झुंजत असलेल्या झाकीर हुसेन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तिथेच त्यांनी आज उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला
उस्ताद झाकीर हुसेन यांचे मित्र बासरीवादक राकेश चौरसिया यांनी पीटीआयला सांगितले की, मागच्या आठवड्यात प्रकृती बिघडल्याने झाकीर हुसेन यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. हृदयासंबंधीच्या आजारापणामुळे मागच्या आठवडाभरापासून सॅन फ्रान्सिस्को येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ मध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झाला. आपल्या तबला वादनातील कौशल्याच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच संगीतक्षेत्रात मोठी झेप घेतली. त्यांच्या कलागुणांचा गौरव करताना भारत सरकारने त्यांना १९८८ मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण आणि २०२३ पद्मविभूषण देऊन गौरविले आहे. याशिवाय, १९९९ मध्ये त्यांना यूएस नॅशनल एन्डॉवमेंट फॉर द आर्ट्सद्वारे राष्ट्रीय वारसा फेलोशिप प्रदान करण्यात आली, त्यानंतर त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचे जागतिक राजदूत म्हणून मान्यता मिळाली होती. त्यांनी तीन वेळा ग्रॅमी अवॉर्डही जिंकला होता. उस्ताद झाकीर हुसेन हे पहिले भारतीय संगीतकार आहेत, ज्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये जागतिक मैफिलीसाठी आमंत्रित केले होते.
उस्ताद झाकीर हुसेन यांच्या वडिलांचं नाव उस्ताद अल्लाह रक्खा कुरैश होतं. ते पेशाने तबला वादक होते. त्यांच्या आईचं नाव बीवी बेगम होतं. झाकीर हुसेन यांनी मुंबईतील माहिम येथील सेंट मायकेस स्कूलमधून शिक्षण घेतलं होतं. तर मुंबईतील सेंट झेव्हियर कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली होती. ११ वर्षीय झाकीर हुसेन यांनी थेट अमेरिकेत पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आपली कला सादर केली होती.