बोपोडी :
बोपोडी येथील व्हिजन नेक्स्ट डोळ्यांचे हॉस्पिटल मध्ये शासकीय नियमांचे उल्लंघन करून जनतेची लूट करीत असले बाबत महानगर पालिका आरोग्य अधिकाऱ्यांना मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
भाऊ पाटील रोड बोपोडी, येथे जनतेच्या पैशातून जनतेच्या सोयीसाठी एक अद्ययावत डोळ्यांच्या हॉस्पिटलची उभारणी केलेली आहे. सदर हॉस्पिटल सध्या व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन ( दत्तात्रय वळसे पाटील आय हॉस्पिटल) तर्फे चालविले जाते. सदर हॉस्पिटलची धर्मादाय विभागाकडे नोंद आहे. तथापि सदर हॉस्पिटलने तेथे कोठेही धर्मादाय अशी पाटी लावलेली नाही.
तसेच हॉस्पिटलमध्ये औँधरोड, बोपोडी येथील गरीब नागरिक डोळ्याच्या मोती बिंदूच्या उपचारासाठी गेल्यास हॉस्पिटलचे डॉक्टर त्यांना हे खाजगी हॉस्पिटल असून मोतीबिंदूच्या एका डोळ्याच्या शस्रक्रियेसाठी साधारणपणे रूपये १३ हजार ते ३१ हजार रूपयापर्यंत कोटेशन देत असल्याची माहिती मनसेचे मयूर बोलाडे यांनी दिली.
नागरिकांनी सदर हॉस्पिटल हे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असून येथे त्याप्रमाणे सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया का होत नाहीत अशी विचारणा केल्यास, यावर हॉस्पिटलचे प्रशासन सदर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आमच्या हॉस्पिटलमध्ये होत नाही असे कारण सांगतात.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.निना बोराडे यांना निवेदन देण्यात आले.तरी व्हिजन नेक्स्ट हॉस्पिटलमध्ये चाललेल्या प्रकाराची गांभियनि दखल घेऊन त्याची सखोल चौकशी करून, सामान्य नागरिकांसाठी असलेल्या सर्व योजना तेथे राबविण्यात याव्यात अन्यथा सदर गैरप्रकाराविरूद्ध मनसे पक्षाच्या वतीने तीव्र जन आंदोलन उभारू असे निवेदन मनसेचे मयुर राम बोलाड़े (शाखा अध्यक्ष, वॉर्ड क्र. २६ छत्रपती शिवाजीनगर मतदार संघ) यांच्या वतीने देण्यात आले आहे.