चेंबूर :
चेंबूर येथील सिद्धार्थनगरमधील आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यात त्यांनी दुर्दैवी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना सर्वतोपरी आधार देण्याचा दिलासा दिला.
दूर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेता यावी यासाठी उपाययोजनांचाही आढावा घेतला जाईल. या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम रखडले असेल तर त्याबाबतही बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, माजी खासदार राहुल शेवाळे, तसेच मुंबई महापालिकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.
दरम्यान, आज पहाटे ४.३० ते ५.०० च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत एका दुमजली घराला भीषण आग लागली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती समोर आली आहे. २ लहान मुलांसह घरातील एकूण ७ जणांचा यात मृत्यू झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या घटनेवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलं की, “चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत लागलेल्या भीषण आगीत होरपळून एकाच कुटुंबातील अनेक जणांचा दुर्दैवानं मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो. काहीजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यांना लवकरात लवकर बरं वाटेल अशी प्रार्थना करतो.” असं अजित पवार यांनी लिहिलं आहे.