अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी सामाजिक न्याय विभागाची रमाई आवास योजना; योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

0
slider_4552

पुणे :

राज्यशासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या रमाई आवास घरकुल योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

अनुसूचित जातीच्या लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागांमध्ये त्यांना स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घरांच्या ठिकाणी पक्के घर देण्यासाठी सन 2008 पासून रमाई आवास घरकुल योजना राबवण्यात येते.

या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी उत्पन्न मर्यादा 1 लाख रुपये तर शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी 3 लाख रुपयांपर्यंत आहे. सदर योजनेंतर्गत ग्रामीण भागात घरकुल बांधण्यासाठी प्रती घरकुल (शौचालय बांधकामासह) 1 लाख 32 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. शहरी भागात प्रति घरकुल 2 लाख 50 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. राज्य शासनाने सन 2024-25 या वर्षात या योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रासाठी 75, नगरपरिषद क्षेत्रासाठी 93, नगरपंचायत क्षेत्रासाठी 14 व ग्रामीण क्षेत्रासाठी 697 घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर केले आहे.

या योजनेच्या लाभासाठी नागरी क्षेत्रातील लाभार्थ्यांनी संबंधित महानगरपालिका कार्यालय, नगर परिषद किंवा नगर पंचायत कार्यालयात तर ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांनी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यात अर्ज करावेत, असेही लोंढे यांनी सांगितले.

See also  मतदानाच्या काळात कोणत्याही यात्रा, सुट्टी न करता मतदानाचा हक्क बजावा – डॉ. नीलम गोऱ्हे