अनुकंपा तत्वावरील शिक्षकांना पाच वर्षात टीईटी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार

0
slider_4552

मुंबई :

राज्यात अनुकंपा तत्त्वावरील प्राथमिक शिक्षक नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) लागू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना तीन वर्षांची मुदत देण्यात आली होती. यामध्ये वाढ करत आता तीन ऐवजी पाच वर्षात या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) 23 ऑगस्ट 2010 रोजी एक अधिसूचना जारी केली. त्यामध्ये पहिली ते आठवीच्या प्राथमिक शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता निश्चित करत शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली. त्यानुसार राज्य शासनाने 13 फेबवारी 2013 आणि 6 मार्च 2013 (शुद्धिपत्रक) रोजीच्या निर्णयाद्वारे राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी किमान व्यावसायिक पात्रता निश्चित केली. त्यात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) किंवा शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आली.

20 जानेवारी 2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्त्वावर नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली होती. हा निर्णय एनसीटीईच्या निर्णयाशी विसंगत असल्याने अनुकंपा तत्त्वावरील, नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन वर्षांची मुदत देण्यात आली होती.

दिलेल्या मुदतीत उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांची सेवा समाप्त करून त्यांना इतर पदावर नियुक्ती देण्याबाबत स्पष्ट करण्यात आले होते. परंतु शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयानुसार टीईटी किंवा सीईटीईटी उत्तीर्ण नसलेल्या, परंतु अनुकंपा तत्त्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना देण्यात आलेली तीन वर्षांची मुदत वाढवण्यात आली आहे. आता ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना पाच वर्षे मिळणार आहेत.

See also  भाजप प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार संजय काकडे यांच्या मालमत्ता जप्तीचे उच्च न्यायालयाने दिले आदेश..