मुंबई :
सरकारने हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून सध्या कार्यरत असलेले एअर मार्शल अमर प्रीत सिंग, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, यांची 30 सप्टेंबर 2024 पासून, एअर चीफ मार्शल पदावर, पुढील हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सध्याचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे 30 सप्टेंबर 2024 रोजी राजीनामा देऊन पदमुक्त होत आहेत.
अमर प्रीत सिंग यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1964 रोजी झाला. त्यांना डिसेंबर 1984 मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ वैमानिक शाखेत नियुक्त करण्यात आले होते. सुमारे 40 वर्षांच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित सेवेत त्यांनी कमांड, स्टाफ, निर्देशात्मक आणि परदेशी नियुक्ती अशा विविध पदांवर काम केले आहे.
नॅशनल डिफेन्स अकादमी, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी असलेले हे एअर ऑफिसर योग्यता असलेले फ्लाइंग इंस्ट्रक्टर आणि एक प्रायोगिक टेस्ट पायलट असून त्यांना विविध प्रकारच्या फिक्स्ड आणि रोटरी विंग विमानाच्या 5,000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे.