भारतातील सर्व विमानतळे, सीमांवर ‘मंकीपॉक्स अलर्ट’; ‘या’ देशातून येणाऱ्या प्रवाशांवर राहणार विशेष लक्ष

0

दिल्ली :

आफ्रिका खंडातून मंकीपॉक्स या आजाराने सीमा ओलांडल्या आहेत. पाकिस्तानात मंकीपॉक्सचा चौथा रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेसह देशातील सर्व बंदरे आणि विमानतळांवर मंकीपॉक्स अलर्ट जारी केला आहे.

जगभरात काही ठिकाणी मंकीपॉक्स या आजाराची साथ दिसून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानेही मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

मंकीपॉक्स साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने मंकीपॉक्स सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये सर्व विमानतळ, बंदरे आणि आरोग्य पथकाला सतर्क करणे, चाचणी प्रयोगशाळा, तपासणीसाठी आरोग्य सुविधा तयार करणे, मंकीपॉक्सचा एखादा रुग्ण सापडल्यास त्याच्यावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत.

मंकीपॉक्स आजार ओर्थोपोक्स या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांत हा विषाणू आढळत असून हे प्राणी या विषाणूचे नैसर्गिक स्त्रोत आहेत. अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी 1 ते 2 दिवसापासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्यापडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यंत, बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो.

मंकीपॉक्स हा प्रामुख्याने थेट शारीरिक संपर्क, शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्राव, बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यामार्फत, जर खूप वेळ बाधित व्यक्तीचा संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे होणाऱ्या संसर्गाद्वारे होवू शकतो. त्याचप्रमाणे, प्राण्यांपासून माणसालाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते. बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिकाऱ्यांना बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये मंकीपॉक्सच्या लक्षणांबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिल्लीतील राम मनोहर लोहिया, सफदरजंग आणि लेडी हार्डिंज या तीन मोठ्या केंद्रीय रुग्णालयांमध्ये नोडल केंद्र तयार केली आहेत. मंकीपॉक्सच्या रुग्णांवर उपचार आणि काळजी घेण्यासाठी या रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. सध्या भारतात कोणालाही मंकीपॉक्सची लागण झालेली नाही.

See also  दो धागे श्रध्दा के उपक्रमांतर्गत प्रभू श्रीरामांसाठी पुण्यातून वस्त्र व माता सीतेसाठी साडी अयोध्येला रवाना

दरम्यान कोरोना प्रतिबंधक कोविशील्ड लस बनवणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट या कंपनीने मंकीपॉक्सवर लस तयार करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सीईओ आदर पूनावाला यांनी ‘आम्ही ही लस एका वर्षात तयार करू’ अशी माहिती दिली आहे.