मंकीपॉक्स आजाराला घाबरू नका, सतर्क रहा

0

दिल्ली :

जगभरात काही ठिकाणी मंकीपॉक्स या आजाराची साथ दिसून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानेही मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

मंकीपॉक्स साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने मंकीपॉक्स सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये सर्व विमानतळ, बंदरे आणि आरोग्य पथकाला सतर्क करणे, चाचणी प्रयोगशाळा, तपासणीसाठी आरोग्य सुविधा तयार करणे, मंकीपॉक्सचा एखादा रुग्ण सापडल्यास त्याच्यावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत.

*मंकीपॉक्स आजार काय आहे?*

मंकीपॉक्स आजार ओर्थोपोक्स या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांत हा विषाणू आढळत असून हे प्राणी या विषाणूचे नैसर्गिक स्त्रोत आहेत. अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी 1 ते 2 दिवसापासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्यापडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यंत, बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो.

मंकीपॉक्स हा प्रामुख्याने थेट शारीरिक संपर्क, शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्राव, बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यामार्फत, जर खूप वेळ बाधित व्यक्तीचा संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे होणाऱ्या संसर्गाद्वारे होवू शकतो. त्याचप्रमाणे, प्राण्यांपासून माणसालाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते. बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

*संशयित रुग्णाची लक्षणे*

मंकीपॉकस् रुग्णाला मागील 3 आठवड्यात मंकीपॉक्सबाधित देशांमध्ये प्रवास करुन राज्यात आलेल्या व्यक्तींच्या शरीरावर अचानक पुरळ उठणे, सुजलेल्या लसीका ग्रंथी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा, घसा खवखवणे आणि खोकला अशा प्रकारची लक्षणे आढळून येतात.

*आजारापासून दूर राहण्यासाठी घ्यावयाची काळजी*

संशयित मंकीपॉक्स रुग्णास वेळीच विलग करणे आवश्यक आहे. रुग्णांच्या कपड्यांशी अथवा अंथरुण पांघरुणाशी संपर्क येऊ देऊ नये. हातांची स्वच्छता ठेवावी. आरोग्य संस्थांमध्ये मंकीपॉक्स रुग्णावर उपचार करताना पीपीई किटचा वापर करावा. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

See also  भारतातील  सागरी क्षेत्रात ८२ अब्ज डॉलर  किंवा सहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

*खबरदारीच्या उपाययोजना*

मंकीपॉक्स या आजाराविषयी प्रशासनाच्यावतीने सर्वप्रकारची काळजी घेण्यात येत आहे. जिल्ह्यात आपल्या कार्यक्षेत्रात मंकीपॉक्स आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. यानुसार आरोग्य सेवा आयुक्त रंगा नायक यांनी विभाग प्रमुखांसोबत बैठक घेवून सर्व क्षेत्रीय आरोग्य उपसंचालक, आरोग्य अधिकारी, महापालिकांचे आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांना सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी देखील सतर्कता बाळगल्यास या आजाराच्या संसर्गापासून दूर राहता येईल.

राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त, आरोग्य सेवा तथा व्यवस्थापकीय संचालक रंगा नायक म्हणाले, “मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराला घाबरून न जाता नागरिकांनी सतर्क राहावे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच या आजाराबाबत संशयित रुग्ण आढळल्यास किंवा काही लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.”