मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाचा जनजागृतीवर भर*

0

बारामती :

बारामती लोकसभा मतदारसंघात स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याकरिता विविध उपक्रम राबवून जनजागृती करावी तसेच याकरिता स्थानिक प्रशासकीय यंत्रणा, सेवाभावी संस्था, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, बचत गटातील महिला आदी घटकांचा सक्रीय सहभाग घ्यावा, अशा सूचना बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिल्या.

विधानभवन येथे आयोजित बारामती लोकसभा मतदारसंघातील समन्वयक अधिकारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी समन्वयक अधिकारी हनुमंत आरगुंडे, समिक्षा चंद्राकर, अतिरिक्त समन्वयक अधिकारी विजय मुळीक, सुप्रिया डांगे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक चरणसिंह राजपूत आदी उपस्थित होते.

द्विवेदी म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या मतदान केंद्रावर येत्या 7 मे रोजी अधिकाधिक मतदान होईल याबाबत नियोजन करावे. मतदारांना मतदान केंद्र आणि केंद्रावरील सुविधांबाबत तसेच मतदान प्रक्रियेविषयी माहिती देण्यात यावी. मतदार चिट्ठीचे वेळेत वितरण करावे. याबाबत नोंदवही अद्ययावत ठेवावी. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी गाव पातळीवर विशेष लक्ष देऊन काम करावे. सहापेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात.

लोकसभा मतदारसंघात भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी), आदर्श आचारसंहिता कक्ष (एमसीसी) पथकांनी देण्यात आलेल्या जबाबदारीप्रमाणे अधिक प्रभावीपणे कामे करावीत. मतदारसंघात आदर्श आचारसंहिता नियमांचे उल्लघंन होत असल्यास त्याबाबत कडक कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा. लोकसभा निवडणुका निर्भय, भयमुक्त आणि निःपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी एकदिलाने आणि समन्वयाने कामे करावीत, असेही द्विवेदी म्हणाल्या.

समन्वयक अधिकारी अरगुंडे म्हणाले, निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठीच्या रोकड, मद्य, तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस प्रतिबंध करावा आणि अशा घटनांवर विशेष लक्ष ठेऊन कारवाई करावी. आचारसंहिता भंगाबाबत घटनांवर लक्ष द्यावे. निवडणुकीतील गैरप्रकारांची माहिती घ्यावी तसेच सी-व्हिजिल आणि नियंत्रण कक्षाकडे आलेल्या तक्रारींवर तात्काळ कारवाई करावी. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईमध्ये सातत्य ठेवत जिथे आवश्यकता भासेल तिथे पथके वाढवावी. कारवाईच्या अनुषंगाने आवश्यतेनुसार सर्व कागदपत्रे सोबत ठेवावी.असे श्री. अरगुंडे म्हणाले.

See also  पुण्यात रिक्षांची भाडेवाढ, किलोमीटरसाठी 3 रुपये अधिक मोजावे लागणार..

बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडण्यासाठी प्रोत्साहित करावे व स्वीप उपक्रमांअंतर्गत विविध यशस्वी उपक्रम राबवावेत,असे समन्वयक अधिकारी चंद्राकर यांनी सांगितले.