पुणे :
संक्रांतीच्या निमित्ताने शहरातील वेताळ टेकडी, तळजाई टेकडी, हनुमान टेकडी यासह अन्य ठिकाणी पतंग उडवण्यास लोक जातात. इथे अनेकदा मांजा झाडावर अडकलेल्या दिसतो. हा मांजा जमा करून आणून देणाऱ्यांना बक्षीस दिले जाणार आहे. तसेच जखमी पक्षी अढळल्यास हेल्पलाईनद्वारे त्वरीत मदत दिली जाणार आहे, असे सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.कल्याण गंगवाल यांनी सांगितले.
जखमी पक्षांबाबत डॉ. कल्याण गंगवाल (मो. क्र. 9823017343), सुनील परदेशी (मो. क्र. 9823209184 ), गौरव गाडे (मो. क्र. 7030285520) किंवा रेस्क्यू वाईल्ड लाईफ (मो. क्र 9172511100) या क्रमांकावर माहिती देऊन अहिंसा प्रेमी नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. गंगवाल यांनी केले.
चीनी मांजा सापडल्यास संबंधितांवर पाच वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाखाच्या आर्थिक दंडाची तरतूद आहे. मात्र, शासकीय यंत्रणेच्या ढिलेपणामुळे हा मांजा बाजारात विकला जात आहे. त्यामुळे चीनी मांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
या मांजामुळे माणसांसह अनेक पक्षी ही जखमी होतात. त्यामध्ये कबुतर, कावळा, घुबड, पोपट, घार आणि फुलपाखरे यांचा समावेश आहे. गेल्या आठ वर्षात जवळपास अडीच हजार पक्ष्यांना वाचविण्यात यश आले आहे. यंदाही एक रुग्णवाहिका, पशुवैद्यकीय डॉक्टर आणि चार-पाच कार्यकर्ते ही बचावकार्य मोहिम महिनाभर राबविणार आहेत. त्यासाठी हेल्पलाइन सुरु करण्यात आली असून, यामध्ये रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेस्क्यू वाइल्डलाइफ टीटीसी या संस्थांचे सहकार्य मिळाले आहे, असे ही गंगवाल यांनी सांगितले आहे.