पुणे :
आगामी लोकसभा, विधानसभा आणि पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. 14) होणारा महायुतीचा मेळावा महत्वपूर्ण ठरणार आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करणार असल्याने त्याकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिवसंग्राम आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांचा पुणे जिल्ह्यातील पहिला संयुक्त मेळावा येत्या रविवारी पुण्यात होत आहे. या मेळाव्याची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदारपणे सुरू केली आहे. एरवी भाजपवर हल्लाबोल करणारे अजित पवार यावेळी प्रथमच गोडवे गाणार असल्याची कुजबुज सुरू आहे.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांचा पुणे जिल्ह्यातील पहिला संयुक्त मेळावा येत्या रविवारी पुण्यात होत आहे. या मेळाव्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणार आहेत. आजवर भाजपला ‘कमळाबाई’ असे हिणवणारे अजित पवार हे या मेळाव्यामध्ये भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची शाळा घेत मोलाचा उपदेश करणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये बंडखोरी रोखण्यासाठी अजित पवार हे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सल्ला देत गुरुजींची भूमिका कशी वाटविणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
पुणे शहरात हडपसर आणि वडगांवशेरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार सक्रीय आहेत. त्या दोघांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या दोघांचीही भाजप कशी समजूत काढणार याकडे लक्ष लागले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातून चेतन तुपे पाटील यांनी माजी आमदार योगेश टिळेकर यांचा तर, वडगांवशेरी मतदारसंघात सुनील टिंगरे यांनी माजी आमदार जगदीश मुळीक यांचा पराभव केला आहे.