पुणे :
पुणे महापालिकेतील भाजपचे तब्बल १९ नगरसेवक महाविकास आघाडीत जाण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे हे नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेत पद न मिळाल्याने हे नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे १९ नाराज नगरसेवक महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
मतदारसंघाच्या विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याची तक्रार भाजप नगरसेवकांनी शहराध्यक्षांकडे केली होती.पण याबाबत टाळाटाळ करत निवडक लोकांनाच विचारपूस होत असल्याने भाजपचे नगरसेवक नाराज असल्याचं कळतं. दरम्यान, या चर्चांमध्ये सत्यता नाही. हा निव्वळ खोडसाळपणा आहे. नगरसेवकांच्या नाराजीचा आणि बंडखोरीचा कोणताही विषय भाजपच्या गटात नाही. एकहाती सत्ता महापालिकेत आहे. असा कितीही प्रयत्न केला तरी आमच्यात फाटाफूट होणार नाही.सर्व नगरसेवक एकत्र आहेत. गेल्या चार वर्षात आतला-बाहेरचा असा कोणताही भेद करण्यात आलेला नाही. सर्वांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी आमच्यात फाटाफूट होणार नाही, असे महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकाला एकच वर्ष बाकी आहे. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीची जोरदार तयारी राष्ट्रवादीकडून सुरू आहे. त्या दृष्टीने पक्षाकडून भाजपातील नगरसेवकांचा अंदाज घेण्यात येत आहे. राष्ट्रवादीतून गेल्यावेळी भाजपात गेलेले तसेच इतर इच्छुकांना गळ टाकण्याची व्यूव्हरचना राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. त्याला काही प्रमाणात यश मिळत असून त्यातून आलेल्या काही नावांवर आज माध्यमांत चर्चा सुरू झाल्याने राजकीय वादळ सुरू झाले आहे.
येत्या महापालिका निवडणुकीत पुणे व पिंपरीत काहीही करून सत्ता हस्तगत करण्याची तयारी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या रूपाने राष्ट्रवादी सत्तेत असल्याने या प्रयत्नांना बळ मिळत आहे. त्यामुळे जसजशा निवडणुका जवळ येतील त्याप्रमाणे या चर्चा होत राहणार आहेत. मात्र, प्रभाग रचना कशाप्रकारे होतात, त्यावरच कोण कुठल्या पक्षात जातो याचा निर्णय होणार आहे.