बेळगांव :
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जनसेवक मेळाव्यासाठी आज सायंकाळी बेळगावात दाखल होत आहेत. या दौऱ्यात अमित शहा यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची भेट धुडकावल्याने मराठी भाषिकांमधुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहा दाखल होण्यापुर्वीच त्यांना बेळगावात कडाडून विरोध होत आहे. शेतकऱ्यांनी सकाळी राणी चन्नम्मा चौकात चक्क ‘अमित शहा गो बॅक’ चा नारा देत अर्धनग्न अवस्थेत निदर्शने करुन शेतकरी कायद्यावरुन निषेध नोंदवला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज बेळगावात सभा होत आहे. जनसेवक मेळावा असे नामकरण करण्यात आलेल्या मोहिमेचा बेळगावात समारोप होणार आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या भाजपधार्जिण्या सदस्यांना सभेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. सभेसाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, गोविंद कारजोळ यांच्यासह वीसहून अधिक मंत्री उपस्थित राहणार आहेत.
दौर्यामुळे शहा यांच्या स्वागताचे कट आऊटस, स्वागत कमानी, भाजपच्या झेंड्यांनी शहर व्यापून गेले आहे. सांबरा विमानतळ ते जिल्हा क्रीडांगणापर्यंत सर्व रस्त्यावर स्वागत फलक लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर सदाशिवनगर, मुख्य बसस्थानक रस्ता, अशोक चौक, चन्नमा चौक आदी मार्गही स्वागत फलकांनी व्यापून गेला आहे.