कळवा :
ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या तीन दिवसांत 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रुग्णालयाला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले आहेत की, “आज रुग्णालयात रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली.”
शिंदे म्हणाले, “18 लोकांचा दुर्देवी मृत्यू झालेला आहे. यासाठी कालच चौकशी समिती गठीत केली आहे. 25 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याची सूचना या समितीला देण्यात आली आहे.” मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज रुग्पणालयत 12 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 ते रविवार 13 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8.30 वा. या 10 तासांच्या कालावधीत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेची योग्य ती चौकशी करून पुन्हा अशी घटना घडु नये, यासाठी शिफारस व अहवाल करण्याकरिता समिती गठित करण्याचे नि्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
त्यानुसार आयुक्त, आरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे.शासन निर्णयानुसार, आरोग्य सेवा आयुक्तालयाचे आयुक्त अध्यक्ष असणार आहेत. तसेच सदस्य सचिव म्हणून ठाणे आरोग्य मंडळाचे उपसंचालक, सदस्य म्हणून ठाणे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे महानगरपालिका आयुक्त, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक – १, आरोग्य सेवा (राज्यस्तर) सहसंचालक, वैद्यकीय आरोग्य देखभाल व दुरुस्ती पथकाचे सहायक संचालक, भिषकतज्ञ (आयुक्त, आरोग्य सेवा द्वारे नामनिर्देशित) असणार आहेत.
ही समिती या घटनेचा घटनाक्रम निश्नित करणे, रुग्णालयातील सर्व यंत्रणेची वस्तूस्थिती तपासणे, अशा प्रकारच्या घटना पुन्हा भविष्यात घड्र नये याकरीता आवश्यक उपाययोजना, शिफारशी सुचविणे, रुग्णालयात दहा तासांत १८ रुग्ण दगावल्याने रुग्णालयातील अतिदक्षता कक्षामधील व सामान्य कक्षात उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी या घटनेबाबत केलेली कार्यवाही / उपाययोजना तपासणे, रुग्णालयात घडलेल्या घटनेची कारणमीमांसा करणे व त्याअनुषंगाने आवश्यकतेनुसार संबंधित यंत्रणा, अधिकारी व कर्मचाऱ्यावर जबाबदारी निश्रित करणे आदींची चौकशी करणार आहे.