मुळशी तालुक्यात नांदे येथे बर्ड फ्लू : पाच हजार कोंबड्या मारल्या

0
slider_4552

नांदे :

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नांदे येथे बर्ड फ्ल्यूचा विषाणू सापडल्याने शनिवारी (दि.१६) या परिसरातील पाच हजार कोंबड्या मारण्यात आल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या मावळ आणि मुळशीतील पथकांनी सहाय्याने शनिवारी संध्याकाळ पर्यंत पोल्ट्रीतील सुमारे पाच हजारावरून अधिक कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. अशी माहिती तालुका पशूसंवर्धन अधिकारी डॉ.सचिन काळे यांनी दिली.

नांदे येथील शिंदे वस्तीवर राहत असलेले अमित अशोक रानवडे यांच्या पोल्ट्रीत काही दिवसांपूर्वी चार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. त्यानंतर रोज चार ते पाच कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागला. त्यामुळे चार दिवसांपूर्वी तेथील पोल्ट्री मालकाने मृत कोंबड्यांची तपासणी पुणे येथील औंधच्या प्रयोगशाळेत करून घेतली. त्यावेळी त्यात बर्ड फ्लू विषाणू नसल्याचा अहवाल आला होता.

मात्र तरीही कोंबड्यांचे मरण्याचे प्रमाण वाढतच गेल्याने आणखी नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग संस्थेकडे पाठविला. त्याचा अहवाल शुक्रवारी (दि.१५) रात्री उशिरा आला आणि त्यात या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूच्या विषाणूने झाल्याचे निष्पन्न झाले. प्रशासनाने नांदे परिसरातील सर्व नागरिकांना व ग्रामस्थांना सूचना देऊन जेसीबीच्या साह्याने खड्डा घेऊन बर्ड फ्लूचा संसर्ग झालेल्या कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

याबाबत जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. शिवजी विधाटे म्हणाले, नांदे येथील शिंदेवस्ती येथील एका शेतकऱ्याच्या घरगुती कोंबड्यांना बर्ड र्फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून तेथील संसर्ग झालेल्या भागाच्या एक किलोमीटर अंतरावरील सर्व कोंबड्या नष्ट केल्या जात आहेत. तसेच जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार परिसरातील दहा किलोमीटर परिघातील कोंबड्यांची खरेदी, विक्री तसेच वाहतूकही तातडीने बंद केली जात आहे. यावेळी तहसीलदार अभय चव्हाण, गटविकास अधिकारी सतीश जठार यांनी घटनास्थळी भेट दिली.

See also  बोलक्या झाडांची निवीदा रद्द करण्याबाबत मनसे च्या वतीने महापालिका आयुक्त व महापौरांना निवेदन.