मुंबई :
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या महिलेच्या विरोधात आता काही मंडळी बोलू लागली आहेत. भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी या महिलेने `हनी ट्रॅप`मध्ये अडकवल्याची तक्रार पोलिसात दिली. त्यानंतर याच महिलेकडून असाच प्रयत्न मनसे नेते मनीष धुरी यांच्यासोबत घडल्याचे उघड झाले. ही तीन प्रकरणे समोर आलेली असतानाच आणखी एक उघड झाले आहे.
भाजपाचे नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ती मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. तसेच सातत्याने मला रिलेशनशिपसाठी बळजबरी करत होती. त्यांनी याबाबत मुंबई पोलिसांना सविस्तर पत्र लिहून माहिती दिली आहे.
भाजप नेते हेगडे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, रेणू शर्मा यांनी मला देखील रिलेशनशिपच्या हनीट्रॅपमध्ये ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक दावा केला आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करावी, असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले आहे.
रेणू शर्मा या महिलेविरोधात आणखीन एक तक्रार दाखल झाली आहे. रेणू शर्माविरोधातील दाखल झालेली ही चौथी तक्रार समोर येतेय. जेट एअरवेजचे अधिकारी रिझवान कुरेशी यांनी रेणू शर्माविरोधात तक्रार दाखल केली आहे. रेणू शर्माने आपल्याला ब्लॅकमेल केलं असा आरोप रिझवान कुरेशी यांनी केला आहे. रिझवान यांनी केलेल्या तक्रारीनंतर आता या प्रकरणामध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट आला आहे. जेट एअरवेज कंपनीत अधिकारी असलेल्या रिझवान कुरेशी नामक तरुणाच्या विरोधातही अशीच तक्रार संबंधित महिलेने दिल्याचे म्हटले आहे. या तरुणाची सोशल मिडीयावरून ओळख झाली. त्यानंतर मैत्री, त्यानंतर भेटीगाठी, हॉटेलिंग आणि बरेच काही घडले.