महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचा लिलाव झाला, अनेक उदयोन्मुख खेळाडूंवर लागली बोली..

0

पुणे :

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी (6 जून) पुणे येथे पार पडला. सहा संघांचा सहभाग असलेल्या या लिलावात अनेक उदयोन्मुख खेळाडूंवर बोली लावण्यात आली.

लिलावावेळी सहा संघांची नावेही जाहीर करण्यात आली. सुहाना मसालेवालेंचा पुणे संघ पुणेरी बाप्पा नावाने ओळखला जाईल. ऋतुराज गायकवाड हा या संघाचा आयकॉन खेळाडू असेल. पुनित बाल समुहाचा संघ कोल्हापूर टस्कर्स, ईगल इन्फ्रा इंडियाचा संघ ईगल नाशिक टायटन्स, वेंकटेश्वरा इंडस्ट्रिजचा संघ छत्रपती संभाजी किंग्ज, जेटस सिंथेसिसचा संघ रत्नागिरी जेटस, कपिल सन्सचा संघ सोलापूर रॉयल्स अशा नावाने ओळखला जाईल.

महाराष्ट्राचा अनुभवी फलंदाज नौशाद शेख हा या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. केदार जाधव कर्णधार असलेल्या कोल्हापूर टस्कर्स संघाने त्याच्यावर तब्बल सहा लाखांची बोली लावली.

पुणे येथे झालेल्या या लिलावात जवळपास सर्वच संघांची नौशाद याच्यावर नजर होती. सुरुवातीला ईगल नाशिक टायटन्स व पुणेरी बाप्पा यांनी त्याच्यावर बोली लावली. मात्र, बोली चार लाखांच्या पार गेल्यानंतर अचानकपणे कोल्हापूर स्पर्धेत उतरला. नाशिकने माघार घेतल्याने अखेरपर्यंत कोल्हापूर व पुणे यांच्या दरम्यान त्याला आपल्या संघात घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच झाली. अखेर सहा लाखांची सर्वात मोठी बोली लावत कोल्हापूर संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. विशेष म्हणजे त्याची बोली 60 हजारांच्या आधारभूत किमतीने सुरू झालेली. याचाच अर्थ त्याला त्याच्या मूळ किमतीच्या 10 पट रक्कम मिळाली.

दिव्यांग हिंगणेकरला रत्नागिरी जेटसने ४ लाख ६० हजार रुपयांची बोली लावली. साहिल औताडे (३ लाख ८० हजार), अंकित बावणे (२ लाख ८० हजार) या खेळाडूंनाही रत्नागिरीने मिळविले. सोलापूरने सत्यजित बच्छावला ४ लाख ६० हजार रुपयांना खरेदी केले. शमशुझमा काझीला (२ लाख ८० हजार) छत्रपती संभाजीनगर किंग्ज, सिद्धेश वीरला (२ लाख ६० हजार) ईगल नाशिक टायटन्सने, आशय पालकर आणि कौशल तांबेला (प्रत्येकी २ लाख ४० हजार) देखिल नाशिकने खरेदी केली. पुणेरी बाप्पा संघाने सुरज शिंदेसाठी २ लाख ४० हजार, तर रोहन दामलेसाठी २ लाक रुपयांची बोली लावली.

See also  खेळाडूंसाठी खेळाची मैदाने सुरू करण्याबाबत सूचना द्याव्यात : अजित पवार

लिलावासाठी ३०० हून अधिक खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये अ गटात रणजी करंडक खेळाडूंचा समावेश होता. त्यांची ६० हजार ही मूळ किंमत निश्चित करण्यात आली होती. १९ वर्षांखालील आणि ब गटातील खेळाडूंसाठी ४० हजार रुपये किंमत ठरविण्यात आली होती. क गटासाठी २० हजार रुपये ही पायाभूत किंमत होती. खेळाडूंच्या खरेदीसाठी सहाही फ्रॅंचाईजींना २० लाख रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली होती. फ्रॅंचाईजींना संघात १६ खेळाडूंचा समावेश करायचा होता. यामध्ये १९ वर्षांखालील दोन खेळाडू असणे अनिवार्य होते. १९ वर्षांखालील गटातून सचिन धस हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. कोल्हापूर संघाने सचिनसाठी १ लाख ५० हजाराची बोली लावली.

आयकॉन खेळाडू म्हणून नामांकित करण्यात आलेले खेळाडू
ऋतुराज गायकवाड (पुणेरी बाप्पा), केदार जाधव (कोल्हापूर टस्कर्स); राहुल त्रिपाठी (ईगल नाशिक टायटन्स) राजवर्धन हंगरगेकर (छत्रपती संभाजी किंग्स, अझीम काझी (रत्नागिरी जेट्स), विकी ओत्सवाल (सोलापूर रॉयल्स)

या लिलावादरम्यान एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांनी मोठी घोषणा केली. पुढील वर्षी अशाच प्रकारे चार महिला संघांना घेऊन, महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.