पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड शहरातील एचए मैदानावर ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचं सादरीकरण सुरु आहे. या महानाट्याचा मोफत पास द्यावा म्हणून पिंपरी पोलिसांनी धमकी दिल्याचा आरोप खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे.
महानाट्याचं पास दिले नाही तर सादरीकरण कसं होतं ते बघतो, अशी धमकी पोलिसांनी दिल्याची माहिती त्यांनी देत खंत व्यक्त केली आहे. शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या मंचावरून खासदार अमोल कोल्हे यांनी याबाबत भाष्य केलं आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पोलिसांना समज द्यावी,असं आवाहनही त्यांनी केलं.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, जर एखादा पोलीस बांधव मोफत पास मिळावा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कसा सादर होतो हे बघतो, अशी धमकी देत असेल तर माननीय गृहमंत्री महोदयांनी त्यांना समज द्यावी. अंगावर आलेली वर्दी ही केवळ अधिकाराची नाही, ती त्याहीपेक्षा जास्त जबाबदारीची आहे, याचं त्यांनी भान ठेवावं अशी माझी हात जोडून विनंती आहे, असंही ते म्हणाले. तर तिकीट काढून आलेल्या प्रत्येक पालकासाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी मी मानाचा मुजरा करतो, असं वक्तव्य त्यांनी केलं.
वर्दी ही जबाबदारीची असते याची जाणीव ठेवावी, असं डॉ. अमोल कोल्हेंनी ठणकावून सांगितलं. अद्याप फ्री पास मागितलेल्या त्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्याचं नाव समोर आलेलं नाही. परंतु या प्रकारामुळे पोलिसाची मान निश्चितच झुकल्याचं बोललं जात आहे.
एका कलाकाराची कळकळीची विनंती!#ShivputraSambhajiMahanatya #ShivputraSambhaji #ChhatrapatiSambhajiMaharaj #PimpriChinchwad @Dev_Fadnavis @PCcityPolice
(1/3) pic.twitter.com/LDR85uJq2x
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) May 13, 2023