मणिपूरमध्ये अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु: एकनाथ शिंदे

0

मुंबई :

काही दिवसांपासून मणिपूर येथे हिंसा भडकली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारामुळे मणिपूरमध्ये संचारबंदी लागू केली होती.

त्यात आता थोडी शिथिलता देण्यात आली आहे. हिंसाचारामध्ये महाराष्ट्रातले २२ विद्यार्थी अडकल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून आपली अडचण सांगितली. या विद्यार्थ्यांना लवकरच विमानातून आसामला आणले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी संबंधितांना आदेश दिले आहेत.

महाराष्ट्राचे अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहेत. सध्याच्या वातावरणात विद्यार्थ्यांनी तिथे राहणे योग्य नाही हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी रविवारी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान, या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान अडकलेल्या २२ विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यासंदर्भात सांगितले आहे.

राज्य सरकार हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्रातील २२ विद्यार्थी मणिपूरमध्ये आहेत. त्यांच्यापैकी विकास शर्मा आणि तुषार अवन यांच्याशी बोललो आहे. दोन्ही विद्यार्थी मणिपूरमधील औद्योगिक संस्थेत शिकत आहेत. त्यांना घरी परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे. मी त्यांना काहीही घाबरू नका असे सांगितले आहे . त्यांना सुखरूप परत आणण्याच्यादृष्टीने सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी मुख्य सचिव मनोज सौनिक आणि इतर राज्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

See also  पाणबुडीच्या आधुनिकीकरणाशी संबंधित गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी नेव्ही अधिकाऱ्यांना अटक