महाराष्ट्रात 5-6 लॉजिस्टिक्स पार्क उभारण्यात येणार : नितीन गडकरी

0
slider_4552

मुंबई :

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने महाराष्ट्रात 5-6 लॉजिस्टिक्स पार्क उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

राज्यात जालना तसेच वर्धा या ठिकाणच्या ड्राय पोर्ट्स उभारणीचे काम पूर्ण झाले असून आता नाशिक आणि पुण्यात देखील असेच ड्राय पोर्ट्स उभारण्याचे काम हाती घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई येथे आयोजित बंदरे, नौवहन आणि लॉजिस्टिक्स या विषयावरील 11 व्या द्वैवार्षिक आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. सजीव सृष्टी तसेच पर्यावरण यांना संरक्षण देण्याला केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले असून प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकार अनेक पर्यायांचा विचार करत आहे आणि त्या अनुषंगाने विविध प्रकल्पांवर युद्ध पातळीवर काम करत आहे, असेही ते म्हणाले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. देशातील एकूण वायू प्रदूषणापैकी सुमारे 40% वायू प्रदूषण रस्त्यांवरील वाहतुकीमुळे होत आहे आणि आता देशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत असल्याचे ते म्हणाले. मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेली डबल डेकर बस तसेच बंगळूरु मध्ये सुरू करण्यात येत असलेली बससेवा हे या उपाययोजनांचे उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. 260 रोप वे, केबल कार यांना देण्यात आलेली मंजुरी देखील याच प्रयत्नांचा भाग असल्याचे ते म्हणाले. दिल्ली परिसरातही सुमारे 65 हजार कोटी रुपयांचे रस्ते प्रकल्प सुरू असून हे काम पूर्ण झाल्यावर त्या भागातील वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

See also  रियल-टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) आठवड्यातून सात दिवस उपलब्ध करण्याचा प्रस्ताव : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास