आयपीएल मध्ये रिंकू सिंग चा धमाका शेवटच्या षटकात पाच षटकार खेचत मिळवला विजय…

0

अहमदाबाद :

इंडियन प्रीमिअर लीग 2023 मध्ये रविवारी (9 एप्रिल) गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध‌ कोलकाता नाईट रायडर्स यांच्या दरम्यान खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या थरारक सामन्यात केकेआरने तीन गडी राखून विजय मिळवला. युवा फलंदाज रिंकू सिंगने अखेरच्या पाच चेंडूंवर पाच षटकार ठोकत केकेआरला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. यासोबतच त्याने काही विक्रमही आपल्या नावे केले.

व्यंकटेश अय्यर व नितिश राणा यांच्या शतकी भागीदारीनंतर केकेआरने 205 धावांचा यशस्वी पाठलाग करण्याच्या दिशेने पाऊल टाकलेले. अय्यरने 40 चेंडूंवर 83 धावा फटकावल्या. मात्र, गुजरातचा कर्णधार राशिद खान याने सतराव्या षटकात सामना बदलला. त्याने रसेल, नरीन व शार्दुल ठाकूर यांना सलग बाद करत हॅट्रिक पूर्ण केली.

केकेआरला विजयासाठी या सामन्यातील अखेरच्या षटकात 29 धावांची गरज होती. उमेश यादवने पहिल्या चेंडूवर एक धाव काढून दिली. त्यानंतर रिंकू सिंगने जगातील सर्वात मोठ्या मैदानावर एक अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली. त्याने उर्वरित पाचही चेंडूवर षटकार मारत संघाला रोमांचक विजय मिळवून दिला.

रिंकू आयपीएल इतिहासात धावांचा पाठलाग करताना अखेरच्या षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 30 धावा केल्या. यापूर्वी धोनीने 2019 मध्ये आरसीबीच्या उमेश यादवविरुद्ध 24 धावा केल्या होत्या. तसेच, मागील वर्षी सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना निकोलस पूरन याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 23 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे या दोन्ही वेळी उभय संघ सामना जिंकण्यात अपयशी ठरलेले.

See also  महिला अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासन आणणार कठोर ‘शक्ती’ कायदा?