पुणे :
पुण्यातील औंध येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका आयटी अभियंत्याने आपल्याच घरामध्ये आपल्या पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलाची हत्या केली. त्यानंतर स्वतःदेखील आत्महत्या केली आहे.
सुदीप्तो गांगुली (वय ४४) असे या व्यक्ती नाव आहे. गांगुली हा मूळचा पश्चिम बंगालचा आहे. सध्या तो पुण्यात वास्तव्यास होता. तो पुर्वी पुण्यातील एका मोठ्या मल्टिनॅशनल आयटी कंपनीमध्ये नोकरी करत होता. साधारण ७-८ महिन्यांपूर्वी त्याने नोकरी सोडून व्यवसाय करण्याचे ठरवले होते. मात्र व्यवसायात मोठे नुकसान झाल्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान गांगुली हा मंगळवारी रात्रीपासून फोन उचलत नव्हता. त्यामुळे त्याच्या बंगळूरू येथील भावाने पुण्यातील मित्रांकरवी तो हरवला असल्याची तक्रार चतुरशृंगी पोलीस ठाण्यात दिली. बुधवारी सकाळी तक्रार मिळताच पोलिसांनी गांगुली यांच्या घरी भेट दिली. यावेळी घरामध्ये तिघांचे मृतदेह आढळले. यामध्ये पत्नी व मुलगा यांचा चेहरा पॉलिथिन बॅगने आवळलेला दिसला.
यावरुन प्रथम त्यांची हत्या करुन स्वतः आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या घरी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही आहे. त्यामुळे पोलीस पुढील तपास करत आहेत.