रोमांचक सामन्यांत भारताचा न्यूझीलंडवर 12 धावांनी विजय..

0
slider_4552

हैदराबाद :

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबाद येथे खेळण्यात आला. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 12 धावांनी विजय मिळवला.

शुबमन गिलने भारतीय संघासाठी द्विशतक केले. न्यूझीलंडसाठी मायकेल ब्रेसवेलने प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र, त्याला संघालख विजय मिळवून देण्यात अपयश आले. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 1-0 असा आघाडीवर आला आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभनमने अवघ्या 87 चेंडूंत तडाखेबाज शतक पूर्ण केले. शतकानंतर न थांबता चौफेर चौकार षटकारांची आतषबाजी करताना त्याने 145 चेंडूत विक्रमी द्विशतक पूर्ण केले. 149 चेंडूंत 19 चौकार व 9 षटकारांची बरसात करून तो 208 धावांवर बाद झाला. गिलच्या खेळीने भारताने निर्धारित 50 षटकांत 8 बाद 349 धावांचा डोंगर रचला. भारताच्या या आव्हानासमोर किवी संघाच्या मायकेल ब्रेसवेलच्या झुंजार शतकाच्या जोरावर 49.2 षटकांत 337 धावा करत भारताचा विजय लांबवला.

सध्या शानदार फॉर्म मध्ये असलेला व आपल्या घरच्या मैदानावर पहिलाच सामना खेळत असलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने सामना जिंकून देणारी गोलंदाजी केली.

जसप्रीत बुमराह याच्या अनुपस्थितीत सिराज वनडे क्रिकेटमध्ये भारताचा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही त्याने त्याची प्रचिती सर्वांना दिली. 350 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडला त्याने कॉनवेच्या रूपाने पहिला धक्का दिला. त्यानंतर त्याने जम बसवत असलेला न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम याला तंबूचा रस्ता दाखवला. न्यूझीलंडला सामन्यात पुनरागमन करून दिलेल्या मिचेल सॅंटनर व मायकेल ब्रेसवेल या जोडीला फोडण्याचे काम देखील त्यानेच केले. 46 व्या षटकात गोलंदाजीला आल्यावर त्याने या जोडीची 163 धावांची भागीदारी संपवली. सॅंटनरला 57 धावांवर बाद केल्यानंतर त्याने पुढच्याच चेंडूवर हेन्री शिप्लीला त्रिफळाचीत करत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. त्याने आपल्या 10 षटकात 46 धावा देत 4 बळी टिपले.

See also  ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यांचे निधन