कसबा आणि पिंपरी-चिंचवड या दोन जागांवर पोटनिवडणूक जाहीर….

0
slider_4552

नवी दिल्ली :

केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी (१८ जानेवारी) ईशान्येकडील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली.

यात त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर मेघालय आणि नागालॅंड या राज्यांत २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहेत. त्यानंतर २ मार्चला तिन्ही राज्यांमधील मतदानाचे निकाल जाहीर होणार आहेत. आजपासून या तिन्ही राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

याशिवाय महाराष्ट्रातीलही दोन विधानसभा मतदासंघातही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड या दोन जागांवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या दोन जागांवर २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर २ मार्च तीन राज्यांच्या विधानसभेसोबतच या दोन जागांवरीलही निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

दोन्ही जागांवर भाजपचे आमदार होते :

पोटनिवडणूक जाहीर झालेल्या दोन्ही जागांवर भाजपचे आमदार होते. यात पुणे शहरातील ‘कसबा पेठ’ मतदारसंघातून मुक्ता टिळक या आमदार होत्या. मात्र २२ डिसेंबर रोजी त्यांचं निधन झालं. तर चिंचवड मतदारसंघातून लक्ष्मण जगताप आमदार होते. पण त्यांचंही ३ जानेवारी रोजी निधन झालं आहे. त्यानंतर अवघ्या महिन्याभरात या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम :

कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी ३१ जानेवारी रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. ७ फेब्रुवारी ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. तर ८ फेब्रुवारी अर्जांची छाननी आणि १० फेब्रुवारी पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी२७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर २ मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.

 

See also  महापालिका निवडणुक ४ सदस्यीय पद्धतीने होणार, शिंदे सरकारचा मोठा निर्णय.