कोथरूड :
यंदाचा महाराष्ट्र केसरीचा खिताब नांदेडचा प्रतिनिधी पुण्याचा शिवराज राक्षे याने पटकावलाय. महाराष्ट्र केसरी 2023 च्या अंतिम लढतीत शिवराजने सोलापूरच्या महेंद्र गाडकवाड याचा अवघ्या 55 सेकंदात पराभव केला आणि महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या खिताबर नाव कोरलं.
महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावल्यानंतर शिवराज राक्षे याला मानाची चांदीची गदा, महिंद्रा थार जीप आणि पाच लाख रूपये रोख असं बक्षीस देण्यात आलं. तर उपविजेता महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाख रूपयांचे बक्षीस देण्यात आलं आहे.
महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावणाऱ्या पैलवानाला मानाची चांदीची गदा, महिंद्रा थार जीप आणि पाच लाख रूपये रोख असं बक्षीस देण्यात येतं. याशिवाय राज्यभरातील कुस्तीवर प्रेम करणारे कुस्ती प्रेमी देखील या मल्लाला आपापल्या परीने बक्षीस देत असतात. याशिवाय महाराष्ट्र सरकारकडून या पैलवानांना 5 हजार रूपये मानधन दिलं जातं. यात वाढ करून यंदापासून हे मानधन 15 हजार रूपये करण्यात आले आहे. शिवाय महाराष्ट्र केसरी खेळाडूंना राज्य सरकार नोकरीत संधी देणार आहे. आजच्या विजयानंतर शिवराजवर देखील अभिनंदनासह राज्यभरातून बक्षीसांचा वर्षाव करण्यात येत आहे. याबरोबरच सर्व वजनी गटातील 18 विजेत्यांना जावा बाईक देण्यात येणार आहेत.
पुण्यात मोठ्या उत्साहात आज महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे दिमाखदार आयोजन आणि प्रत्येक वजनी गटातील विजेत्यांना मिळणारी भरघोस बक्षिसे यामुळे ही स्पर्धा सुरुवातीपासूनच चर्चेत होती. संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याजच्या स्पर्धेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पैलवानांसाठी काही घोषणा केल्या.
महिला केसरीसाठी राज्य सरकार मदत करणार असल्याची महत्वाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. याबरोबरच महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, अर्जुन पुरस्कार, वयोवृद्ध कुस्तीपटूंसाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या. महाराष्ट्र आणि हिंद केसरी विजेत्यांना 15 हजार रूपये मानधन तर ऑलिम्पिक आणि अर्जुन पुरस्कार विजेत्यांना 20 हजार रुपयांचं मानधन देण्यात येणार आहेय याबरोबरच वयोवृद्ध खेळाडूंचं मानधन अडीच हजारांहून साडेसात हजार रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली.