थरारक सामन्यांत भारताचा श्रीलंकेवर दोन धावांनी विजय..

0

मुंबई :

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. हा सामना भारतीय संघाने 2 धावांनी आपल्या नावावर केला. या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी चोपलं आणि गोलंदाजांनी रोखलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हा सामना जिंकत भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 162 धावांचा डोंगर उभा केला होता. तसेच, 163 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पार करताना श्रीलंका संघाला निर्धारित 20 षटकात सर्वबाद गमावत 160 धावाच करता आल्या. अशाप्रकारे भारतीय संघाने हा सामना 2 धावांनी खिशात घातला.

श्रीलंका संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार दसून शनाका (Dasun Shanaka) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 27 चेंडूत 45 धावा केल्या. या धावा करताना त्याने 3 चौकार आणि 3 षटकारांची बरसात केली. त्याच्याव्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिस याने 28, तर वनिंदू हसरंगा याने 21 धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा पार करता आला नाही.

यावेळी भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना पदार्पण करणाऱ्या शिवम मावी (Shivam Mavi) याने सर्वाधिक विकेट्स आपल्या नावावर केला. या सामन्यात त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 22 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त हर्षल पटेल आणि ‘वेगाचा बादशाह’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमरान मलिक यांनी प्रत्येकी 2 विकेट्सवर आपले नाव कोरले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून फलंदाज दीपक हुड्डा (Deepak Hooda) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 23 चेंडूत नाबाद 41 धावांचे योगदान दिले. या धावा करताना त्याने 1 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर ईशान किशन याने 37 धावांचे योगदान दिले. तसेच, अक्षर पटेल नाबाद 31 आणि कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) 29 धावा करून बाद झाला. इतर एकाही फलंदाजाला 2 आकडी धावसंख्या उभारता आली नाही. पदार्पण करणारा शुबमन गिल फक्त 7 धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव यानेही गिल एवढ्याच 7 धावा केल्या. तसेच, संजू सॅमसन याला 5 धावांवर समाधान मानावे लागले.

See also  दुसरा टी २० सामना जिंकून भारताची मालिकेत बरोबरी

यावेळी श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना पाच गोलंदाजांना विकेट घेण्यात यश आले. दिलशान मदुशनाका, महीश थीक्षणा, चमिका करुणारत्ने, धनंजय डी सिल्वा आणि वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येक 1 विकेट नावावर केली.