महापालिकेतील ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यास विरोध

0
slider_4552

पुणे :

महापालिकेतील ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. हे टेंडर रद्द करून पुणे जिल्हा सुरक्षा मंडळाकडूनच सुरक्षारक्षक घ्यावेत, त्यामुळे कामगारांची पिळवणूक थांबेल, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी केली आहे. तसेच अनेक नागरिकांनीही या विषयी संतप्त भावना व्यक्त केल्या.

महापालिकेतील ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सुमारे ३५० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार असल्याची तक्रार जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडे प्राप्त झाली होती. त्यानंतर मंडळाने महापालिकेला खरमरीत पत्र पाठवून कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी करू नका, अशा सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका भवनासमोर आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला. अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करा, अशी मागणी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.

या संदर्भात मनसेचे सरचिटणीस संभूस यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले आहे. शासकीय, निमशासकीय, खासगी ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमताना जिल्हा मंडळाकडूनच सुरक्षारक्षक घेतले पाहिजेत. खासगी ठेकेदार नेमून सुरक्षारक्षकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणली जात आहे, शासनाचा निधी बुडत आहे. त्यामुळे टेंडर रद्द करून मंडळाकडूनच सुरक्षारक्षक घ्यावेत, अशी मागणी केली आहे.

See also  पीएमपीएमएल ची ओला - उबर कॅब कंपन्याना टक्कर