नांदेड :
हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहे. मात्र, या हिवाळी अधिवेशनात सामान्य लोकांच्या प्रश्नात स्थान मिळत नसल्याने माजी खासदार संभाजीराजे छत्रपती सत्ताधारी-विरोधकांवर जोरदार आगपाखड केली
स्वराज्य संकल्प अभियानामुळे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे दोन दिवसीय नांदेड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जवळपास ७० शाखांचे उद्घाटन केले. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर व हदगाव तालुक्यात त्यांच्या स्वराज्य संघटनेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. नांदेडमधील एका कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सत्ताधारी-विरोधकांवर जोरदार टीका केली.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ‘तुम्हाला आरोप-प्रत्यारोप करायचा अधिकार आहे. मात्र, तुम्हाला अधिवेशनावेळी करायचं आहे. अधिवेशन संपल्यावर तुम्हाला आरोप-प्रत्यारोप करायचे ते करा. तुम्हाला कोणी थांबवलं. अधिवेशन कशासाठी आहे. तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी हे अधिवेशन आहे’.
‘कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी अधिवेशन असतं. नवीन धोरण आणण्यासाठी अधिवेशन आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी अधिवेशन आहे. मराठा समाजाला आरक्षण का मिळत नाही, त्याच्यासाठी अधिवेशन आहे. ओबीसी समाजाला न्याय कसा देऊ शकतो, त्यासाठी अधिवेशन आहे, असे संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले.
‘तुम्ही अधिवेशन तहकूब करतात. तिथं पूर्ण यंत्रणा लागते. अधिवेशनात दररोज किती खर्च होतो. हे सर्व चुकीचं सुरू आहे. मी अधिवेशनाची व्याख्या सांगितली,असेही ते म्हणाले.