पुणे विद्यापीठ :
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यु.जी.सी.) निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, इंग्रजी विभागात भारतीय भाषा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात देशाच्या विविध राज्यांतून विभागात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत, स्वरचित तसेच त्यांनीच अनुवादित केलेल्या विविध भारतीय भाषांतील कवितांचे सादरीकरण यावेळी केले. यामध्ये गोंडी,अहिरानी, मैथिली, संभलपुरी, आसामी, बंगाली, मराठी, हिंदी, उर्दू या भाषांतील साहित्याचा समावेश होता.
यावेळी विद्यार्थ्यांनी लावलेल्या भित्तीचित्रांमुळे व केलेल्या आकर्षक सजावटीमुळे विभागाचे वातावरण साहित्यमय झाले होते.
या भाषा उत्सवाच्या उद्घाटना प्रसंगी बोलताना, विभागप्रमुख डाॅ.चंद्राणी चटर्जी म्हणाल्या, “भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात विविध भाषा बोलल्या जातात. देशाची हीच विविधता आमच्या विभागात दरवर्षी पहावयास मिळते. कारण विभागात देशातील विविध राज्यांतून विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेश घेतात. त्या सर्व विद्यार्थ्यांना भारतीय भाषांची वैविधता कळावी, हा उद्देश बाळगून या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.”
या सर्व कार्यक्रमाची सांगता ‘माझी भाषा माझे हस्ताक्षर’ या मोहिमेचा अवलंब करून करण्यात आली. विद्यापीठाच्या अन्य विभागातील विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजेरी लावून इंग्रजी विभागाचे कौतुक केले. या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रा.हेमंत शिरसाठ, कार्यलयीन अधिक्षक धिरज मंचरकर यांच्यासह विभागातील विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.