बाणेर :
बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरातील पाणी समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून यावर प्रशासनाकडून काहीच उपाययोजना होत नसल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे चांदणी चौक येथील पाण्याच्या टाकीवर माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, भाजपा नेते प्रल्हाद सायकर यांनी नागरिकांसोबत ठिय्या आंदोलन केले. यावेळी या तिघांनी पाण्याचा वॉल फिरवून बाणेर बालेवाडी कडे जाणारे पाणी सोडले. पालिका अधिकारी आंदोलन स्थळी आले असता चर्चेत वास्तविक मागील काही काळापासून पाणी सोडण्याचे तास कमी करण्यात आले आहे हे निदर्शनास आले. लोकसंख्या वाढण्याचे कारण अधिकाऱ्यांनी दिले पण लोकसंख्या वाढल्याने पाण्याचे तास वाढण्या पेक्षा कमीच झाले.
या आंदोलना बद्दल बोलताना माजी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले की, बाणेर बालेवाडी परिसरात अनियोजित पाणीपुरवठा सुरू आहे. वारंवार अधिकाऱ्यांना सांगून देखील काहीच कारवाई होत नाही. अधिकारी नुसतीच हो, पाहतो, करतो, टाकीत पाणी नाही अशी उत्तरे देत आहेत. त्यामुळे चांदणी चौक येथील पाण्याच्या टाकीवर जोपर्यंत पाणी सुरळीत होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. तसे आंदोलन सुरू होते, परंतु पालिका अधिकारी यांनी येऊन नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी शक्य त्या सर्व गोष्टी करू असे सांगितले.
भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी सांगितले की, जाणुन बुजून केवळ नागरिकांना त्रास व्हावा या यातूनही कृत्रिम प्राणी टंचाई निर्माण केली जात आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस, महाळुंगे या सर्वच परिसरात पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त असून ही समस्या सोडविणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हि कृत्रिम पाणी टंचाई थांबवुन लोकांना मुबलक पाणी देउन हा प्रश्न संपविला पाहिजे.
या आंदोलनात प्रसंगी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, त्याचबरोबर निष्क्रिय अधिकाऱ्याचा प्रतिकात्मक पुतळा व नंदीबैल आणून या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आला.
याप्रसंगी भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, शशिकांत बालवडकर, अनिल ससार, सचिन मानवतकर, शिवम बालवडकर आदी उपस्थित होते.
यावेळी चांदणी चौक येथील पाण्याचे टाकीवर महापालिका अधिकारी प्रसन्ना जोशी, योगिता भांबरे, श्रीधर कामत यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. परंतु या चर्चेच्या वेळी असे निदर्शनास आले की पालिकेच्या अधिकाऱ्यांना बाणेर बालेवाडी परिसरातील पाणी प्रश्नाची जाणीवच नाही. प्रत्यक्षात संबंधित अधिकाऱ्यांना कोणतीच उत्तरे व्यवस्थित देता आली नाही. पाण्याची टाकी, पाण्याचे वॉल, पंप, पाणी किती सोडायला पाहिजे याबद्दल अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ जाणवला. एवढा गंभीर असणारा पाणी प्रश्न का उभा राहतो वारंवार लोक का समस्या मांडतात याची गंभीरता ह्या अधिकाऱ्यांना नसल्याने त्यांनी त्या मागचे अडचण निवारण करण्यासाठी कोणते प्रयत्न केलेले दिसून येत नाही. तरी देखील बऱ्याच वेळानंतर त्यांनी आंदोलन कर्त्यांच्या समस्या जाणून उद्यापासून प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करून काय समस्या आहे याबाबत सोडवणूक केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. जवळपास चार ते पाच तास हे आंदोलन सुरू होते.