विद्यापीठातर्फे ‘ई-कंटेन्ट पोर्टल’ सुरू करण्यात आले आहे.

0

पुणे :

कोरोना विषाणूचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरी, त्यांचे शैक्षणिक नुकसान कमी करण्याकरिता विद्यापीठाने त्यांना घरून अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी विद्यापीठातर्फे ‘ई-कंटेन्ट पोर्टल’ सुरू करण्यात आले आहे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची लेक्चर्स, नोट्स, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तसेच, १००० हून जास्त व्हिडिओ ठेवण्यात आले आहेत. त्यात दिवसेंदिवस भर टाकली जात आहे. त्याचबरोबर शिक्षकांनाही, व्हाट्सअप, ई-मेल, गुगल क्लासरूम व इतर ई-माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक गोष्टी उपलब्ध करून द्याव्यात व त्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांनी याबाबत विद्यापीठातील विविध विभागांचे शिक्षक तसेच, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये व संस्था यांच्या शिक्षकांसाठी आदेश काढले आहेत.

याबाबत प्रा. करमळकर यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांचे शिक्षणही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या वेबसाईटच्या होम पेजवर स्वतंत्र वेब-लिंक सुरू करण्यात आली आहे. त्यावर विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे ई- कंटेन्ट उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय शिक्षकांनाही त्यांच्या विषयाची लेक्चर्स, नोट्स, प्रेझेंटेशन, व्हिडिओ किंवा तत्सम ई-कंटेन्ट उपलब्ध करून देण्याबाबत सांगण्यात आले आहे. आतापर्यंत १००० हून अधिक शैक्षणिक व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. अधिकाधिक साहित्य अपलोड करण्याचे काम सुरूच राहणार आहे. यामुळे सुट्टीच्या काळातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कमी करणे शक्य होईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गोष्टींशी जोडून ठेवता येईल.

See also  कांजूरच्या `त्या' भूखंडावर केंद्र सरकार आणि बांधकाम व्यवसायिक या दोघांचाही अधिकार नसून राज्य सरकारला त्यावर कारशेड उभारण्याचा पूर्ण अधिकार :