तळेगाव :
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना कॅन्सर झाला होता.त्यावेळी ते खचले नव्हते. उलट नेटाने लढा दिला होता. त्यावेळी शरद पवार डॉक्टरांना काय म्हणाले होते . ते अजित पवार यांनी सांगितले शरद पवारांच्या या वागण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही मात्र ते प्रचंड खंबीर आहेत, असं म्हणत त्यांनी शरद पवारांचं कौतुक देखील केलं.
मावळ तालुक्यातील तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित १०० खाटांच्या ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटरच्या उद्धाटनाचा कार्यक्रम आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्तेपार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले,कॅन्सरचं निदान झाल्यावर शरद ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते. एक-एक दिवस उशीर झाला तर आजार वाढणार होता. त्यावेळी आम्ही देखील घाबरलो होतो. ऑपरेशन देखील पार पडलं. तेव्हा डॉक्टरांनी प्रश्न विचारला होता. पवार तुमचं आयुष्य किती आहे, हे सांगू का? त्यावर नेमकं भाष्य काय झालं माहित नाही. पण साहेबांनी डॉक्टरला उत्तर दिलं की मी तुम्हाला पोहोचवल्यावर मी जाणार आहे. तुम्हाला पटणार नाही पण ते असंच म्हणाले. कॅन्सर झाला तरी खचून जाऊ नका, घाबरु नका, त्याचा सामना करायचा, असं शरद पवार कायम सांगत असतात. शिवाय कोणत्याही परिस्थितीत न घाबरता काम करणं, हे त्याच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. आर. आर. पाटील यांनादेखील कॅन्सर झाला हे ज्यावेळी शरद पवारांना कळलं त्यावेळी त्यांनी आबांना त्यांनी फोन केला होता. त्यांचं सांत्वन केलं होतं आणि त्यांना खचून न जाता लढण्याचा सल्ला दिला होता. मात्र आबा खचले आणि महाराष्ट्राला एका चांगल्या नेत्याला मुकावं लागलं होतं. मात्र शरद पवार आजही काम करत आहेत आणि खंबीर उभे आहेत, असं सांगत त्यांनी शरद पवारांच्या खंबीरपणाचा दाखला दिला.
सध्याच्या काळात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं फार गरजेची आहे. आपण काही पथ्ये पाळली पाहिजे, परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, योगा केला पाहिजे, ताणतणाव दूर केला पाहिजे तरच आपण आशा आजारांना दूर करु शकतो. आरोग्यात वजन कमी पाहिजे, बाकी ठिकाणी वजन वाढलं तर काही नाही. जाड व्यक्ती मला दिसला तर मी आधी त्या व्यक्तीला बारीक होण्याचा सल्ला देतो.असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, यासारख्या संस्था पुढे कशा जातील यासाठी पुढच्या पिढीनं लक्ष दिलं पाहिजे, तशा पद्धतीचा दृष्टिकोन ठेवला जाईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. या हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण भर पडेल, यात शंका नाही. या हॉस्पिटलचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत होईल यासाठी राज्य सरकारशी चर्चा करू, प्रयत्नांची शिकस्त करू. याविषयीचा पाठपुरावा करण्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या जातील.