नगर :
शरद पवारांना त्यांचे कार्यकर्ते 80 वर्षांचा तरुण म्हणतात. वयाच्या 80 व्या वर्षात पवार पायाला भिंगरी लावून राज्याचा दौरा करतात, कधी दिल्लीत जातात.
कोरोना (Corona) परिस्थितीत जेव्हा राज्यातले अनेक नेते घराबाहेर पडायला घाबरत होते तेव्हाही पवार राज्याचा दौरा करत होते, शेतक-यांच्या बांधावर जात होते. पवारांच्या या उत्साहाचा हेवा त्यांच्या विरोधकांनाही वाटतो.
पवारांचा असाच उत्साह, कार्यकर्त्यांप्रती तळमळ पुन्हा एकदा दिसली. शरद पवार 6 दिवसांपासून म्हणजे 31 ऑक्टोबरपासून आजारी आहेत, मुंबईच्या ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पण त्याही अवस्थेत पवारांनी राष्ट्रवादीच्या शिर्डीत सुरु असणा-या मंथन शिबिराला हजेरी लावली.
मुंबईहून हेलिकॉप्टरनं पवार शिर्डीत दाखल झाले, त्यानंतर कारनं राष्ट्रवादीच्या मंथन आणि अभ्यास शिबिराला उपस्थित राहिले. फक्त उपस्थित नाही तर पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केलं.
पवारांनी वयाची 80 वर्ष ओलांडलीयेत. त्यांच्या वयाचे फार कमी नेते आज सक्रिय राजकारणात आहेत. पण पवारांचा उत्साह दांडगा आहे. आजारी असतानाही शरद पवारांचा सक्रियपणा कमी झालेला नाही. उलट काही दिवसांपूर्वी मी काय म्हातारा झालोय का अशी मिश्किल टीपणी पवारांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन केली होती. पवारांसाठी पार्टी आणि कार्यकर्ते फर्स्ट असंच म्हणावं लागेल.