नागपूर :
रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर, शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत, असे आव्हान दिले होते.
यानंतर आता 1 नोव्हेंबरपर्यंत या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर मोठा बॉम्बच फोडणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिला आहे. बॉम्ब कुठे आणि कसा फोडायचा हे आपल्याला बरोबर माहीत असल्याचं ते म्हणालेत.
पुढे ते म्हणाले, मी नंगा होईन, मला त्याची काही फिकर नाही. बच्चू कडूचं राजकारण चुलीत गेलं तरी बेहत्तर. उद्या राजकारण सोडावं लागलं, तरी मला काही अडचण नाही. ही आरपारचीच लढाई आहे. तुम्ही असे आरोप करत असाल, तर आम्ही आंडूपांडू थोडी आहोत? जमिनीत नांगर घालणाऱ्या शेतकऱ्याची औलाद आहोत आम्ही. आम्ही घालून टाकू नांगर’, अशा शब्दांत बच्चू कडूंनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले, माझा इशारा हा फुसका बार आहे की बॉम्ब आहे, हे 1 तारखेला दाखवू. हा बॉम्ब कसा कुणाच्या खाली लावायचा हे बच्चू कडूला चांगलं माहीत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलायला हवं, नाही तर आम्ही आमचं काम करू. अस्तित्वंच धोक्यात येत असेल तर मग याचं काय करणार? असा सवाल करत बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी शिंदे फडणवीस सरकारला देखील टोला लगावला आहे.
या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना मी फोन केला असल्याचं देखील सांगितलं. मात्र त्यानंतरही राणांचे आरोप सुरूच असल्याचं ते म्हणाले. धनुष्यबाणवाले आणि अपक्ष दोन्ही आमदार नाराज आहेत. ते संपर्कात आहेत. हा सोबतचा विषय नाही. हा विषय फक्त आरोपाचा आहे. सरकारचा पाठिंबा काढण्याचा विषय नाही. मीडियात वेगळं दाखवतात हा भाग वेगळा आहे. हा फक्त आरोपाचा विषय आहे. तो आरोप गंभीर आहे, असंही बच्चू कडू यावेळी बोलताना म्हणाले.