भंडारा:
महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागून तब्बल १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे गुदमरून बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्नीशमन दलाला त्वरित घटनेची माहिती देण्यात आली आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत १० चिमुकल्या बाळांचा मृत्यू झालाय. तर ७ बाळांना वाचवण्यात यश आलं आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयात घडलेल्या या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. दरम्यान, मध्यरात्री २ च्या सुमारास ही घटना घडली आहे. मात्र, या बाळांच्या आई किंवा अन्य नातेवाईकांना आपल्या बाळाला पाहू दिलेलं नाही. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाबाहेरच बाळांच्या आई आणि नातेवाईक आक्रोश करत असल्याचं अत्यंत दु:खद चित्र भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात पाहायला मिळत आहे.
मृत्यू झालेल्या लहान बाळांमध्ये एखादं बाळ अवघ्या ५ दिवसांचं आहे, तर एखादं १५ दिवसाचं. या सर्व बाळांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे बाळाच्या आईला फक्त दूध पाजण्यापूरतंच अतिदक्षता विभागात प्रवेश दिला जात होता. त्यामुळे दिवसभरात फक्त काही तासांसाठी ही बाळं आपल्या आईच्या कुशीत विसावत होती. पण शुक्रवारी मध्यरात्री काळानं घाला घातला आणि लागलेल्या आगीत १० बाळांचा जीव गेला. आगीची घटना घडल्यानंतर तिथे होत असलेल्या धावपळीमुळं बाळांच्या नातेवाईंकांना घटनेची माहिती मिळाली. पण आपलं बाळ सुखरुप आहे की नाही? याची माहिती मात्र या नातेवाईकांना सकाळपर्यंत कळू शकली नाही.
सकाळी बाळाची आई आणि अन्य नातेवाईकांनी माझ्या चिमुकल्याला मला पाहू द्या, अशी आर्त हाक रुग्णालय प्रशासनाला घातली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयाबाहेरच या नातेवाईकांनी आपला हंबरडा फोडलाय. पण अद्याप त्यांना आपल्या बाळांना पाहता आलेलं नाही.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपूर्ण घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं त्यांनी म्हटलंय. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करुन अन्य बाळांना दुसरीकडे हलवण्याचे आणि लागेल ती मदत पुरवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. या दुर्घटनेत ३ बाळांचा होरपळून तर ७ बाळांचा गुदमरुन मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर दुपारपर्यंत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल होतील. दुर्घटनेची माहिती घेऊन याबाबत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. त्याचबरोबर बाळांच्या नातेवाईकांना बाळांना पाहू देण्यासाठी आपण रुग्णालय प्रशासनाशी बोलणार असल्याचंही यड्रावकर यांनी सांगितलं.