युएई :
संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या आशिया चषकातील भारत व पाकिस्तान हा बहुप्रतिक्षित सामना दुबई येथे खेळला गेला. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही देशातील हा सामना रोमांचक झाला
मात्र, अखेर हार्दिक पंड्या व रवींद्र जडेजा या भारताच्या अनुभवी अष्टपैलूंनी मोक्याच्या क्षणी आपला दर्जा दाखवून देत भारताला 5 गडी राखून विजय मिळवून दिला. यासह भारताने टी20 विश्वचषकात मिळालेल्या पराभवाचा बदला पूर्ण केला.
दहा महिन्यांच्या कालावधीनंतर खेळत असलेल्या या दोन्ही देशांच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. भुवनेश्वर कुमारने चार, अष्टपैलू हार्दिक पंड्याने तीन तर अर्शदीप सिंगने दोन बळी मिळवत पाकिस्तानला 19.5 षटकात 147 धावांवर सर्वबाद केले. पाकिस्तानसाठी सलामीवीर मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 43 धावा केल्या.
प्रत्युत्तरात, भारताचा सलामीवीर केएल राहुल खातेही न खोलता दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी विराट कोहली यांनी सावधगिरीने तसेच खराब चेंडूवर आक्रमण करत भारताची धावसंख्या वाढवली. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 49 धावा केल्या. रोहित 18 चेंडूंवर 12 धावांची संथ खेळी करत बाद झाला. नवाजने त्याला आपल्या पहिल्या षटकाच्या अखेरच्य चेंडूवर बाद केले. त्यानंतर पुढच्या षटकात पुन्हा पहिल्या चेंडूवर त्याने विराटला फसवले. विराटने 34 चेंडूंवर 35 धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव 18 धावा करून माघारी परतला.
भारतीय संघ संकटात असताना दोन अष्टपैलू रविंद्र जडेजा व हार्दिक पंड्या ही जोडी जमली. दोघांनी खराब चेंडूचा खरपूस समाचार घेत चौकार-षटकार वसूल केले. अखेरच्या दहा षटकात १९ धावांची गरज असताना हार्दिकने सलग दोन चौकार वसूल करत सामना भारताच्या बाजूने झुकवला. षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ही चौकार वसूल करत त्याने भारताला ड्रायव्हिंग सीटवर नेले. नवाज टाकत असलेल्या अखेरच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जडेजा बाद झाला. मात्र, त्यानंतर हार्दिकने संयम दाखवत षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला.