पाषाण :
पाषाण-सूसला जोडणारा पूल हा स्थानिक नागरिकांसाठी गैरसोयीचा ठरत असून जोपर्यंत वाहतूकीसाठी सेवारस्ता सुयोग्य व पुर्ण होत नाही तोपर्यंत या पूलाचे उद्घाटन करू देणार नसल्याची भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. यासाठी स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जोरदार निषेध नोंदविला
दोन्ही बाजूंनी सेवारस्ता अरुंद असून पुल संपतो त्या ठिकाणी हा सेवा रस्ता मुख्य रस्त्याला जोडला जाणार आहे यासही नागरीकांनी हरकत घेतली आहे.अरूंद रस्ता व समोरच असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात ये-जा करणा-या गाड्या व पुलावरुन सूसकडे जाणारी वाहने एकत्र आल्यास अपघात घडण्याची शक्यता आहे.यामुळे
या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी होऊ शकते हे लक्षात घेता सेवा रस्ता आणखी पाचशे मीटर पुढे नेऊन मुख्य रस्त्याला जोडावा अशी मागणी नागरिकांनी केली. महत्वाचे म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या सेवा रस्त्यासाठी महामार्गाच्या दिशेकडून काही प्रमाणात भूसंपादन होणे बाकी आहे त्यामुळे अजूनही सेवा रस्ता पुर्ण झालेला नाही.या सर्व समस्यांसंदर्भात स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले होते.
यावेळी सूसरोड बाणेर विकास मंचचे हरेश पाटील, विनय देशपांडे, निखील भोईटे, त्र्यंबक शेळके, संदीप रसालपुरकर, सरला शिंदे, नीलिमा बुवा, प्रशांत जाधव इत्यादींसह अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी भाजपचे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर व राष्ट्रवादी युवकचे समीर चांदेरे, समीर उत्तरकर, यांनीही भेट देऊन नागरीकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.
येत्या मंगळवारी(ता.२३) पालिका अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांनी दिले.