मुंबई :
महाराष्ट्रात रंगलेल्या सत्तानाट्यानंतर अखेर शिंदे- फडणवीसांनी राज्यात सत्ता स्थापन केली. पुढे बऱ्याच चर्चा आणि प्रतीक्षांनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला.
पण, मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता शिंदे गटातल्या आमदारांमध्ये नाराजीनाट्य सुरू झालं.
मंगळवारी सह्याद्रीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अनेक आमदारांनी आपापसात नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाकरे सरकारमध्ये मंत्री राहिलेल्यांनाच पुन्हा मंत्रीपद दिल्यानं काही आमदार नाराज झाले आहेत.
शिंदेंना सुरूवातीला साथ देणाऱ्या आमदारांना डावलून उशिरा आलेल्यांना मंत्रीपदाचे बक्षीस मिळाल्याचा आमदारांमध्ये राग असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
गंभीर बाब अशी की, सह्याद्रीवर झालेल्या बैठकीत काही आमदारांनी परत शिवसेनेत जाण्याची आपआपसांत चर्चा केल्याची माहितीही समोर आली. सह्याद्रीवरील बैठकीत एका आमदाराने मुख्यमंत्र्यांना ऐकू जाईल एवढ्या आवाजात नाराजी व्यक्त केली.
मुंबईतून एकही मराठी आमदाराला मंत्रीपद नाही
मंत्रिमंडळाच्या विस्तारात मुंबईतून एकही मराठी आमदाराला मंत्री केलं नाही, अशी टीका शिवसेनेचे नेते सचिन आहिर यांनी केली. १९९५ नंतर मुंबईचा मराठी मंत्री पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात नाही, असं यावेळी पहिल्यांदाच घडलंय अशा शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
थोडक्यात राज्यात सत्ता आली, मंत्रिमंडळ विस्तारही झाला पण नाराजीचा सूर मात्र आळवलेला नाही. उलटपक्षी परतीच्या वाटांबाबतच्या चर्चांनीच डोकं वर काढलं आहे. अशा परिस्थिती आता राज्यात नेमकं कोणतं सत्तानाट्य पाहायला मिळतं याकडेच सर्वांच्या नजरा असतील.